Ad will apear here
Next
आधी वंदू तुज मोरया...
गणपतीबाप्पा वाजत गाजत आले. भक्तिरसानं ओतप्रोत भरलेल्या गणेशगीतांचे स्वर चहूबाजूंनी ऐकू येऊ लागले. किती नवी-जुनी गाणी! पण एक गाणं मात्र एखाद्या घरात, एखाद्या गणेशमंडळाच्या मंडपात एवढंच नाही, तर तुमच्या आमच्या मनात सदैव वाजत असतं ते म्हणजे ‘आधी वंदू तुज मोरया...’ ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज त्याच गाण्याबद्दल...
.........
हिरवंगार पाचूचं दान देऊन श्रावण निरोप घेतो आणि गणरायाच्या आगमनाची सुवार्ता घेऊन भाद्रपद येतो. मंगलदायी, शुभदायी वारा जणू सर्वत्र खेळू लागतो. या वाऱ्यांवर आरूढ झालेले असतात ढोल-ताशांचे गजर, जणू उत्साहाचा उसळता सागर. गणपतीबाप्पा वाजत गाजत आले...घराघरात, गावा-गावात आणि गर्दीनं फुलून गेलेल्या शहरात, गावोगावी विराजमान झाले. भक्तिरसानं ओतप्रोत भरलेल्या गणेशगीतांचे स्वर चहूबाजूंनी ऐकू येऊ लागले. किती नवी-जुनी गाणी! पण एक गाणं मात्र एखाद्या घरात, एखाद्या गणेशमंडळाच्या मंडपात एवढंच नाही, तर तुमच्या आमच्या मनात सदैव वाजत असतं ते म्हणजे... 

मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया...

किती साधी, सोपी प्रासादिक रचना शांता शेळके यांनी लिहिली आणि लतादीदींनी गायली. अर्थात हृदयनाथ मंगेशकर यांनी ती स्वरबद्ध केली. सर्व कलांची देवता असं गणपतीचं वर्णन केलंय. साहित्य आणि संगीतकलेचं वरदान श्री गणरायानं भरभरून दिलंय, असं हे गाणं ऐकतांना वाटतं. शांताबाईंना साहित्याचं आणि मंगेशकर भावंडांना संगीताचं वरदान देणारा साक्षात श्री गजानन! वर्षानुवर्षे आपण हे गीत ऐकतो; पण याची गोडी कधीही कमी झाली नाही किंबहुना ती वाढतच गेली. गणरायाचं हे वरदानच नाही का?

कोणत्याही शुभकार्याची सुरुवात असू दे, आधी वंदन गणरायाला. संतसज्जनांनीही आपल्या काव्यरचनांमधून गणेशस्तुती, गणेशवंदन केलंय. ज्ञानेश्वरमाउलींनी ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथ लिहिताना वाङ्मयगणेशाला वंदन केलंय...‘ओम नमोजी आद्या। वेद प्रतिपाद्या।’ असं म्हणून एक सर्वांगसुंदर रूपकच जणू ज्ञानदेवांनी रचलं. चित्ताच्या, मनाच्या एकरूपतेसाठी आधी गणेशाला वंदन केलं, की काव्यप्रतिभेला अनेक धुमारे फुटतात... ती चहूअंगांनी बहरते आणि एक अक्षय, अक्षर अशी कलाकृती निर्माण होते. ज्ञानेश्वरीसारखं साहित्याचं अक्षरलेणं संत ज्ञानेश्वरांनी मराठी सारस्वताला बहाल केलं. संत तुकाराम महाराजांच्याही गणेशवंदना सर्वश्रुत आहेत. श्री गणेशाच्या रूप-गुणांचं वर्णन करणारा अभंग म्हणजे...

धरोनिया फरश करी। भक्तजनांची विघ्ने वारी
ऐसा गजानन महाराजा। त्यांचे चरणी लाहो माझा 

श्री गणरायाच्या हातातलं शस्त्र भक्तजनांची संकटं नष्ट करण्यासाठी, दुष्टांचा संहार आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी. संत एकनाथांनी तर गणरायाला वंदन करताना म्हटलंय...

नमन श्री एकदंता। एकपणे तूचि आता।
एकी दाविसी अनेकता। परि एकात्मता होय संसारु।।

नाथांची ही रचना समजून घेताना गणेशोत्सवाचा खरा अर्थ सर्वांनाच उमजला पाहिजे असं वाटतं. ‘परि एकात्मता होय संसारु’ हाच खरा गणेशोत्सवाचा अर्थ आहे. याच उद्देशानं गणेशोत्सव सुरू झाला. एकीची भावना वाढीस लागावी, समाजात, पर्यायानं देशात दुही माजवली जाऊ नये हा खरा उद्देश. पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र्याचं महत्त्व, ते मिळण्यासाठी मोजावी लागणारी किंमत, प्राणांच्या आहुती याचा विचार एकत्र होऊन करण्यासाठी गणेशोत्सवासारखं प्रभावी निमित्त होतं. त्यातूनच कला-संस्कृतीही फुलत गेली...अनेक कलावंतांना कला सादर करण्यासाठी संधी मिळाली. नारायण श्रीपाद राजहंस या अलौकिक गायकाला लोकमान्य टिळकांकडून ‘बालगंधर्व’ ही पदवी मिळाली ती गणेशोत्सवातच. गणेशोत्सव हे भारतीय संस्कृतीचं एक अतूट अंग आहे. गणेशाची उपासना हजारो वर्षांपासून आजतागायत सुरू आहे.  

कालपरत्वे गणेशोत्सवाचं बदलतं स्वरूप आपल्याला दिसतं; पण गणपतीबाप्पाविषयीची भावना मात्र कधीच बदलली नाही. भक्तीभाव तोच, पण व्यक्त करण्याची तऱ्हाही बदलत चाललीय... हे बदलतं स्वरूप पर्यावरणाला घातक ठरू नये, म्हणून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आवाहन केलं जातंय. काही गणेशमंडळं अनुकूल प्रतिसाद देतायत; पण संख्या वाढायला हवी. हिडीस स्वरूप जाऊन मंगलदायी गणेशोत्सवाचं मूळ रूप पुन्हा दिसावं, म्हणून समाजहितैषी प्रयत्न करताहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश यावं म्हणून श्री गणरायालाच साकडं घालू या. श्रीगणरायाचं साजिरं-गोजिरं रूप हृदयात साठवताना पुन्हा शांताबाईंची अविस्मरणीय रचना ओठांवर येतेच. 

सिंदूरचर्चित धवळे अंग, चंदनउटी खुलवी रंग
बघता मानस होते दंग, जीव जडला चरणी तुझिया
आधी वंदू तुज मोरया... 

खरंच गणपतीबाप्पाची सिंदूरचर्चित मूर्ती, चंदनाच्या उटीनं खुलणारा रंग आणि त्या गोजिऱ्या गणरायाकडे पाहता पाहता दंग होणारं मन आजही अनुभवायला येतं. कवित्व जागवणारा गणपती, प्रतिभेचं वरदान देणारा गणराज, कला-संस्कृती जोपासण्याचं भान जागृत करणारा श्रीगणराया कृपेचा सागर आहे. किती नावं या गणपतीबाप्पाची? प्रत्येक नावामागं एक कथा! संस्कृतीवर्धनाची, सज्जनशक्तीला आवाहन करणारी, दुर्जनांना आव्हान देणारी... कथा नुसत्याच वाचायच्या नाहीत, सांगायच्या नाहीत, तर अनुसरायच्या आहेत... हा गणेशोत्सव माझ्या गणपतीबाप्पाचा! हा गणेशोत्सव माझाच नाही तर आमचा सर्वांचा... सर्वांनी आनंदानं बेहोष होण्याचा. ही बेहोषी आत्मोन्नतीची, ही बेहोषी पर्यावरण रक्षणाची, ही बेहोषी सामाजिक बांधिलकीची, कला-संस्कृती जोपासण्याची आणि भक्तिरंगात न्हाऊन निघण्याची, भक्तिरसात ओतप्रोत झालेल्या शांताबाईंनी लिहिलेल्या या गणेशवंदनेची...

गौरीतनया भालचंद्रा, देवकृपेचा तू समुद्र
वरदविनायक करुणागारा, अवघी विघ्ने नेसी विलया
आधी वंदू तुज मोरया...

कृपेचा सागर, करुणेचं आगर, अवघी विघ्नं दूर करणारा गौरीतनय, भालचंद्र, वरदविनायक अशा त्या गणपतीबाप्पाला वंदन करू या आणि गणेशोत्सव खऱ्या अर्थानं मंगलदायी होईल असा साजरा करू या... एकमुखानं पुन्हा गाऊ या...

गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया...

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रातून वरिष्ठ उद्घोषिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत.)

(कविता... स्वरांनी मोहरलेल्या या सदरातील लेखांचे पुस्तक आणि ई-बुक प्रसिद्ध करण्यात आले असून, ते बुकगंगा डॉट कॉमवर उपलब्ध आहे.)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EYYTBF
Similar Posts
चाफा बोलेना... संगीतकाराला काव्याची उत्तम जाण असेल, तर त्याने दिलेल्या चालीवर कविता कशी मोहरते आणि रसिकांच्या मनात सदैव रेंगाळते याचं उत्तम उदाहरण म्हणजे कवी ‘बीं’चं वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं ‘चाफा बोलेना’ हे गाणं. १९ जानेवारी हा वसंत प्रभूंचा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज घेऊ या त्याच कवितेचा आस्वाद
सप्तपदी हे रोज चालते... आज २१ डिसेंबर, जनकवी पी. सावळाराम यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांनी लिहिलेल्या, वसंत प्रभूंनी संगीत दिलेल्या आणि लतादीदींनी गायलेल्या एका सुंदर गीताचा... सप्तपदी हे रोज चालते...
ही वाट दूर जाते... कवयित्री शांता शेळके यांचा जन्मदिन नुकताच (१२ ऑक्टोबर) होऊन गेला. तसेच ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्मदिन २६ ऑक्टोबर रोजी आहे. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज पाहू या शांताबाईंनी लिहिलेली आणि हृदयनाथ यांनी संगीतबद्ध केलेली ‘ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा.
स्वतंत्रतेचं स्तोत्र... स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशालाच देव मानलं. देशभक्ती हाच देशरूपी देवाप्रत पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे हे जाणलं. म्हणून तर देशरूपी देवाची स्तुती गाण्यासाठी त्यांनी ‘स्वतंत्रतेचं स्तोत्र’ लिहिलं. आज स्वातंत्र्यदिन आहे. त्या निमित्ताने ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ सदरात आस्वाद घेऊ या स्वतंत्रतेच्या स्तोत्राचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language